निष्काळजीपणा आणि प्रामाणिकपणा

निष्काळजीपणा आणि प्रामाणिकपणा

१९७५-१९७७ या काळात बलसाड [गुजरात] मध्ये कॅशियर होतो. पगार ५०० सुद्धा नव्हता.बॅचलर लाईफ होते. शाखा ११ ते अशी होती.काम फार जास्त नव्हते. मस्त चाललं होतं. सगळे ग्राहक गुजराती होते. या लोकांचं एक वैशिष्ट होतं. या लोकांना काम करवून घेण्यात रस होता. तक्रार इत्यादी करण्यात विश्वास नव्हता.

मी राहायला एका बिल्डिंग मध्ये एका रूम मध्ये होतो. रूम्स पुढील भागी होत्या मागे गच्ची, बाथरूम होती.बलसाड ला मुंबई  सारखाच पाऊस पडतो पूर्ण चार महिने पडतो.बलसाड पासून किलोमीटर जवळ समुद्र आहे.त्या वेळी एक आठवडा सतत पाऊस पडला. गच्चीत खूप शेवाळ जमलं होतं. सकाळी गच्चीत काही कामासाठी गेलो तर शेवाळ असल्याने घसरून पडलो. पाय बऱ्यापैकी दुखावला गेला.

बँकेत गेल्यावर साहेबांना सांगितले  कि आज पाय दुखत असल्याने लवकर निघेन डॉक्टर कडे जाईन. दुपारी कॅश घाई घाईत जमवली. मॅनेजर ने नेहमी प्रमाणे काहीही कॅश  मोजता सेफ ला किल्ली लावून  सेफ बंद केली.नंतर  डॉक्टर कडे गेलो जुजबी औषधं घेतली रूम वर परत येऊन पडलो.

सकाळी दुखणे संपले होते. बँकेत नेहेमी प्रमाणे लवकर गेलो. फक्त स्वीपर होता. आपले काम करत होता. त्याचे काम चालू असल्याने मी मॅनेजरच्या केबिन मध्ये बसलो होतो. पाच मिनिटांनी स्वीपर घाबरत घाबरत माझ्याकडे आला आणि म्हणाला," साहेब माझी काही चूक नाही, मी काही केले नाही,मला काही करू नका " मी त्याला म्हटले 'अरे काय झाले तू असे काय बडबडतोय,' तो म्हणाला 'साहेब आधी कॅश केबिन मध्ये चला' मी त्याच्या मागे कॅश केबिन मध्ये गेलो.तेथे त्याने मधले ड्रॉवर उघडून दाखवले [ त्याला शाखेतले सगळे ड्रॉवर स्वच्छ करायचे सांगितले होते]आणि म्हणाला 'हे पहा आणि मोजून घ्या मी याला हात पण लावला नाही." मी पाहतो तर काय शंभर च्या लूज  नोटा रबर मध्ये गुंडाळून ठेवल्या होत्या. त्या मी मोजल्या. पूर्ण ७५००.०० होते. मी पटकन डॉकेट पहिले त्यात १०० च्या ७५ नोटा लिहिलेल्या होत्या. स्वीपर गयावया करत होता, घाबरला होता. मी त्याला  धीर दिला  त्याला सांगितले कि तू तुझे काम पूर्ण कर आणि थांब. नंतर मॅनेजर आले त्यांना थोडक्यात सांगितले काय झाले. ते म्हणाले 'आधी सेफ उघड, कॅश टॅली करून घेऊ' नंतर सगळी कॅश टॅली केली. सगळे बरोबर होते. मांजर म्हणाले 'नशीबवान आहात " नंतर मॅनेजर ने स्वीपर ला बोलावले त्याचे अभिनंदन केले. स्टाफ ने खमण, ढोकळा  चहा मागवला पैसे अर्थात मलाच द्यावे लागले . मॅनेजर ने तेथे असलेल्या सगळया कस्टमर समोर स्वीपरचा छोटा सत्कार केला.

कल्पना करा कि तेव्हा माझा पगार ५०० होता जर स्वीपर ने पैसे नेले  असते तर मला किती महागात पडले असते.माझ्यावर पोलीस केस पण झाली असती, पण म्हणतात ना जगात ९९% प्रामाणिक लोक आहेत. त्याचा अनुभव आपण बँकर्स ना नेहमीच आलेला आहे .

मी निष्काळजी होतो पण स्वीपर प्रामाणिक होता.

नंतर एक सवय लावून घेतली ती अशी कि कॅश टाकत असताना सगळे ड्रॉवर तपासून मगच कॅश सेफ मध्ये टाकायची.


C D Deshpande 



Comments